Tuesday, October 27, 2020

आज रोजी सूर्य अस्त झाला ...

 

गल्लीच्या टोकाला, तिठ्यावर
सूर्यावाणी राजरोस गल्ल्यावर
मांजरपाटाच्या बंडीत
गिऱ्हाईक नसल्यास
कायम डुलकता, एरव्ही
लाल धाग्याची बिडी
ओठांच्या कोपऱ्यात

कुणाच्या अध्यात
ना मध्यात...
गोविंदा येवो, की गणपती
घट बसो वा रमो- रमो
निवडणूक, नेते,
सभा, मिरवणुका...
याची डुलकी अखंड
आपली गल्ली बरी न
आपला गल्ला
देश राहो अथवा जावो.
लाल धाग्याला कसला त्रास!

दुपारच्या, भोजनवेळी
जेवण असो की वामकुक्षी
सूर्या मावळला की तिथे
सुर्यीण दिसे
कधी सूर्याची पिल्ले
पण तेवढीच

अशात सूर्याने अलीकडेच
राजकीय जीव धरलेला
पेपर वाचून बिचून कुणाला
गाळी घालून कोसे
देशा-बिशाची मिसाईल्स
त्याच्या बातांमधून
दातांच्या फटीतून
अविरत बरसत

कोरोना आवि ते पाछी, बच्चे
सुर्यीण कच्छला रवाना करून
दुकान बंद करून बसला.
जीवनावश्यक असल्यामुळे
आधी उगवला तो सूर्याच
लाल धागा, ते पाछी एकलाच
सूर्य मंदिरात बसून
डुलकत-उचकत
चीनला गाळी घालू लागला.

आज सकाळी मात्र
दूध- ब्रेड घेऊन येताना
तिठ्यावर ही sss गर्दी
पोलीस व्हॅन आणि
हवालदारांची हलचल
गर्दीतल्या लुख्ख्याला चावी
तो वदला, आज रोजी
तो अरुण, आदित्य, अच्युत,
अचिंत्य, विवस्वत् भास्कर
सूर्यावाणी यांची
प्राणज्योत मालवली.
अर्थात हे मी म्हणतो,
लुख्खा वदला
डुलकता सूर्यावाणी
आज लुडकला

मी लुख्ख्यासी पुंसले
कोरोना किंवा कसे?
यावर लुख्खा उवाच,

कोण बोल्तो, जीव दिला...
कोण बोल्तो, कोरोना
कोण बोल्तो, चोराचे काम
कोण बोल्तो, अपघात
भेटला तेव्हा सूर्य,
डाळींच्या पोत्याखाली होता
...किंवा
डाळींची पोती
सूर्याच्या 'अंगावर' होती.
डाळीखाली सूर्य,
दाल गोश्त झालेला
अथवा त्याची
दाल खिचडी पकलेली

हूटर मारत ऍम्ब्युलन्स आली
पंचनामा करून, पोलिसांनी
डाळींची पोती ...
आणि ऍम्ब्युलन्सने बॉडी
योग्य ठिकाणी नेली.
गल्लीच्या तिठ्यावर
समितीचा बोर्ड लागला
आज रोजी आपल्या गल्लीत
तिठ्यावर सूर्य अस्त झाला
सरकार त्याच्या आत्म्यास
कोरोना गती देवो
आणि...
पोलीस त्याच्या पिंडास
दाल तडका देवोत.

गल्लीतले बोर्डस अलीकडे
दाखलेबाज लिहितो.
पाचा उत्तरी सुफळ करतो

गल्लीतील सूर्य लुडकला
तसा तो नित्यस्तुत्य
विश्वरूप , अखिलज्ञ
आकाशस्थ
लुडकेल काय ?
पण आकाशगंगेत
अगणित सूर्य
सांगाती असताना
मला काय त्याचे !

- बारकवी

काळजी घ्या हो काळजी घ्या

 

काळजी घ्या हो काळजी घ्या 
मटन घ्या, चाप घ्या, भेजा घ्या।

तोंडावरती मास्क घ्या,
हातामध्ये ग्लोव्हज घ्या,
चोर किंवा थोर व्हा
जंगलातला मोर व्हा
मोरा संगे छबी घ्या
भैयाजीची डबी घ्या
काळजी घ्या हो काळजी घ्या
मटन घ्या, चाप घ्या, भेजा घ्या।

बुरखा घ्या, वाफ घ्या
साबुदाणा गोळ्या घ्या
दहा तोंडे दहा उपाय
कळत नाही करू काय,
घाबरलेला ससा व्हा
बिळामध्ये दडी घ्या
काळजी घ्या हो काळजी घ्या
मटन घ्या, चाप घ्या, भेजा घ्या।

टीव्ही वरती पॉजिटीव्ह
आपण होतो निगेटिव्ह
तसेच न्यायाधीश व्हा
वाटेल त्याला सजा द्या
बिनकामी मनामध्ये
रोज नव्या न्युज घ्या
काळजी घ्या हो काळजी घ्या
मटन घ्या, चाप घ्या, भेजा घ्या।

सिन्यामध्ये वाफ घ्या
मिंथॉलिप्टस् धूर घ्या
गरम गरम पाण्यामध्ये
कडक कडक रम घ्या
स्टीम ओठातून घ्या
सॅनिटायझर पोटी घ्या
काळजी घ्या हो काळजी घ्या
मटन घ्या, चाप घ्या, भेजा घ्या।

- बारकवी

Monday, July 8, 2019

टू स्टॉप रेन, युज पेन

पाऊस पडू नये
म्हणून शेवटी ...
कविताच करावी लागते.
त्यासाठी जामनिमा
पागोळ्यांखाली
पेन धरा
पेनात पाऊस भरा.
कुठलीही
बस पकडा
तिकीट घ्या, कारण..
थोर कविता
तिकीटापाठी स्फुरते
प्रतिभेला सांगा
गप बस!
उगीच आपली
मध्येमध्ये, मग...
बस उलटी धरा
तीवर पेनातला
पाऊस पाडा.
काहीही खरडा
कोणालाही
दिसत नाही
कोणीही
वाचत नाही
खरी कविता
अदृश्य असते
-बारकवी

Sunday, April 14, 2019

अजुनी बसुनी आहे...

Year End Song.. 01

अजुनी बसुनी आहे, हलता गडी हले ना
मिटले तसेच नेत्र कीं पापणी हले ना !

मजबूत तू रिचावी, म्हणुनीच मी बसावे
मी ठास सांगताच, ग्लासात तू घुसावे
ते आज का नसावे ? रम का उणी पडे ना?
धरिला... असाच प्याला की घोट घेववेना !
अजुनी बसुनी आहे...

की मूड नाही भाव? जमला न आज रंग !
घेण्यात दोन घोट, केलास भंग ढंग ?
पुतळा असा कसा हा, ज्या ग्लासही दिसेना ?
... ज्या ग्लास ही दिसेना

अजुनी बसुनी आहे, हलतां गडी हले ना !
मिटले तसेच नेत्र कीं पापणी हले ना !
अजुनी बसुनी आहे...

-बारकवी

त्या दारुतळी...

त्या दारुतळी पसरलो पीत
चषक रिकामे घेउनि फिरतो,
इथे तिथे टेकीत

सुका चणा मग भारी चाकणा
धुरातुनी चमकते फ्लेक ना
तृप्तपणे प्राशीत बैसतो,
ती माया रिचवीत

विशाल चषकी, लार्ज ओतली,
थंडधार बर्फावर धरली
मनीची कुसप्ट, मते भिरकती
तसे स्टिरावे तीस

मद्यालसा तीन पेग पेलुनी
वाट बघे, झणी रीपीट सांगुनी
कंठजाळ मळमळे,
वळे तो बेसिनकडे शंकीत

वदन खुळे, रसपान साजरे
उभे राहता पाय थरथरे
चषकी अमृत उतू जाय
परि कर्म जाय मातीत

उभी-उभी ती बाटली रिचली
ग्रहणे मम तनु थकली गळली
एक देह, परि चरण विखुरले,
उभा मार्ग- मापीत

त्या दारुतळी पसरलो पीत
चषक रिकामे घेउनि फिरतो,
इथे तिथे टेकीत

-बारकवी

Wednesday, April 29, 2015

‘सरपट गोणी’ समिक्षितांना....



‘सरपट गोणी’ समिक्षितांना
करायचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की...
या कृतीवर ओढीन कोडी ;



सरसावुनि मग शब्दभ्रमाला
उठवुनी संदर्भांची राई,
भिरकावुनि तो लेख द्यायचा
धुसर- बेगड जैसी कल्हई.


गिर्‍हाईकाची करून टाकणे;
साठोत्तर ती दारू गाळित,
जीरा, महुआ, विद्रोहाची
भकून बसणे हिशेब टाळित;


स्वप्नसुमांची काशी करणे
वास्तववादी चड्डी पिळीत
भेसूर मॉडर्न, उत्तर मॉडर्न
पलटी मारीत संत समागम


आस्वादकता अटकर बांधी
स्निग्ध-मधाचे रवाळ पोळे ;
आडोशाला घेत तियेला;
गुळ काढणे माहीत होते.


काड्या ‘सरपट गोण्या’ने ज्या
सारूनि सारूनि सुजवून दिधल्या,
साहित्याच्या गुद भुयारी
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.


‘सरपट गोणी’ षंढ बापडा
कुथू-कुथूनी मरून गेला;
एक संपता दोन आंधळे
देव देतसे साहित्याला!


-बारकवी

मूँछे हो तो उधार की हो, वर्ना....



उधार चड्डी,
उधार पांडू...
उधार टोपी,
उधार दांडू ।



राष्ट्रवादही
उधार थोडा
हिंदुत्वाचा
उधार खोडा ।


उधार शास्त्रे
उधार सेतू
उधार मूँछे
उधार नत्थू ।


-बारकवी