Tuesday, October 27, 2020

आज रोजी सूर्य अस्त झाला ...

 

गल्लीच्या टोकाला, तिठ्यावर
सूर्यावाणी राजरोस गल्ल्यावर
मांजरपाटाच्या बंडीत
गिऱ्हाईक नसल्यास
कायम डुलकता, एरव्ही
लाल धाग्याची बिडी
ओठांच्या कोपऱ्यात

कुणाच्या अध्यात
ना मध्यात...
गोविंदा येवो, की गणपती
घट बसो वा रमो- रमो
निवडणूक, नेते,
सभा, मिरवणुका...
याची डुलकी अखंड
आपली गल्ली बरी न
आपला गल्ला
देश राहो अथवा जावो.
लाल धाग्याला कसला त्रास!

दुपारच्या, भोजनवेळी
जेवण असो की वामकुक्षी
सूर्या मावळला की तिथे
सुर्यीण दिसे
कधी सूर्याची पिल्ले
पण तेवढीच

अशात सूर्याने अलीकडेच
राजकीय जीव धरलेला
पेपर वाचून बिचून कुणाला
गाळी घालून कोसे
देशा-बिशाची मिसाईल्स
त्याच्या बातांमधून
दातांच्या फटीतून
अविरत बरसत

कोरोना आवि ते पाछी, बच्चे
सुर्यीण कच्छला रवाना करून
दुकान बंद करून बसला.
जीवनावश्यक असल्यामुळे
आधी उगवला तो सूर्याच
लाल धागा, ते पाछी एकलाच
सूर्य मंदिरात बसून
डुलकत-उचकत
चीनला गाळी घालू लागला.

आज सकाळी मात्र
दूध- ब्रेड घेऊन येताना
तिठ्यावर ही sss गर्दी
पोलीस व्हॅन आणि
हवालदारांची हलचल
गर्दीतल्या लुख्ख्याला चावी
तो वदला, आज रोजी
तो अरुण, आदित्य, अच्युत,
अचिंत्य, विवस्वत् भास्कर
सूर्यावाणी यांची
प्राणज्योत मालवली.
अर्थात हे मी म्हणतो,
लुख्खा वदला
डुलकता सूर्यावाणी
आज लुडकला

मी लुख्ख्यासी पुंसले
कोरोना किंवा कसे?
यावर लुख्खा उवाच,

कोण बोल्तो, जीव दिला...
कोण बोल्तो, कोरोना
कोण बोल्तो, चोराचे काम
कोण बोल्तो, अपघात
भेटला तेव्हा सूर्य,
डाळींच्या पोत्याखाली होता
...किंवा
डाळींची पोती
सूर्याच्या 'अंगावर' होती.
डाळीखाली सूर्य,
दाल गोश्त झालेला
अथवा त्याची
दाल खिचडी पकलेली

हूटर मारत ऍम्ब्युलन्स आली
पंचनामा करून, पोलिसांनी
डाळींची पोती ...
आणि ऍम्ब्युलन्सने बॉडी
योग्य ठिकाणी नेली.
गल्लीच्या तिठ्यावर
समितीचा बोर्ड लागला
आज रोजी आपल्या गल्लीत
तिठ्यावर सूर्य अस्त झाला
सरकार त्याच्या आत्म्यास
कोरोना गती देवो
आणि...
पोलीस त्याच्या पिंडास
दाल तडका देवोत.

गल्लीतले बोर्डस अलीकडे
दाखलेबाज लिहितो.
पाचा उत्तरी सुफळ करतो

गल्लीतील सूर्य लुडकला
तसा तो नित्यस्तुत्य
विश्वरूप , अखिलज्ञ
आकाशस्थ
लुडकेल काय ?
पण आकाशगंगेत
अगणित सूर्य
सांगाती असताना
मला काय त्याचे !

- बारकवी

No comments:

Post a Comment